Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण विधानसभा निवडणुकीत बाजी कोण मारणार? सर्वांना उत्सुकता!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे
🌑३०७९७९ मतदाना पैकी २२४८९२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण ७५.०६% मतदान
पेण विधानसभा मतदारसंघात कोण होणार बाजीगर? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
१९१ पेण विधानसभेच्या निवडणूकीत एकूण ३०७९७९ मतदाना पैकी २२४८९२ मतदारांनी मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ११६०८७ पुरुष व १०८८०५ स्त्री मतदारांचा समावेश आहे. एकूण ७५.०६% मतदान झाले.पेण विधानसभा निवडणुकीत एकूण ७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु खरी लढत ही महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशीच होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी आपआपले स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने महाविकास आघाडीची मत विभागलेली पहायला मिळाली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र कार्यकर्ते व त्यांची रसद मतदारांपर्यंत पोहोचली नसल्याने नाराज मतदारांचे बहुमूल्य मत कोणाच्या पारड्यात पडलं? त्याचा फायदा व तोटा कोणाला होणार हे २३ तारखेला समजेल.
एकूण ७ उमेदवारांमध्ये भाजप कडून रविशेठ पाटील, शिवसेने कडून प्रसाद भोईर, शेकाप कडून अतुल म्हात्रे, बहुजन समाजवादी पार्टीकडून अनुजा केशव साळवी, अभिनव भारत कडून मंगल पाटील, वंचित बहुजन आघाडी देवेंद्र कोळी तर विश्वास बागुल हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु खरी लढत महायुतीचे भाजप उमेदवार रविंद्र पाटील, महाविकास आघाडी शेकापचे अतुल म्हात्रे, महाविकास आघाडी उबाठा गटाचे प्रसाद भोईर यांच्यात पाहायला मिळाली.महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनील तटकरे, भाजपचे खासदार धैर्यशील पाटील, विद्यमान आमदार रवीशेठ पाटील व मित्रपक्ष या शक्ती एकत्र आल्याने रवीशेठ पाटील यांचे पारडे जड झाले असले तरी आपापसातील नाराजी दूर करण्यात त्यांना किती यश आले? मतदारांपर्यंत पोहोचून ते मत परिवर्तन करण्यात त्यांचे कार्यकर्ते किती यशस्वी झाले यावर त्यांचा विधानसभेत पुन्हा जाण्याचा मार्ग यशस्वी होऊ शकतो.
महाविकास आघाडी शेकापचे अतुल म्हात्रे हे राजकारणात नवखे असले तरी निवडणूक काळात त्यांनी सोशल मीडिया व इतर माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली होती. निवडणुकीच्या आधी विविध नवनवीन उपक्रम राबवून मतदारसंघातील युवकवर्ग, खेळाडू, महिला बचत गट, आध्यात्मिक क्षेत्र व इतर क्षेत्रातील व्यक्तींसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांनी वातावरण निर्मिती केली होती. मात्र महाविकास आघाडीतील बिघाडीचा फटका किती बसतो यावर त्यांचे विधानसभेत जाण्याचे स्वप्न अवलंबून आहे. माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी त्यांना पाठिंबा देऊन निवडणुक प्रचारात रणधुमाळी उडवून वेगळी ऊर्जा निर्माण केली होती. तसेच इतर पक्षातील अदृश्य शक्तींनी त्यांना दिलेल्या पाठिंब्या रुपी ऊर्जेचे मतात परिवर्तन झाले तर अतुल म्हात्रे यांची निशाणी असलेल्या शिट्टीचा आवाज पेण मतदार संघात घुमण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडी उबाठा गटाचे प्रसाद भोईर यांची जमेची बाजू म्हणजे सुरुवातीला ते अपक्ष उमेदवार म्हणून ज्या मतदारांच्या विश्वास व ताकदीच्या जोरावर हिंमत केली त्याचा फायदा होईल. तसेच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या एकगठ्ठा मतांची मिळालेली जोड. मात्र शेवटच्या दोन दिवसांत त्यांच्याबाबत अफवा पसरल्या होत्या. त्या अफवांचे निराकरण करण्यात ते कितपत यशस्वी झाले यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रसाद भोईर यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत दिलेली रसद कार्यकर्ते व मतदारांपर्यंत पाहिजे त्याप्रमाणात पोहोचली नसल्याची चर्चाही सुरू आहे. त्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदरीत पेण विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार, शिट्टी वाजणार की मशाल पेटणार हे मतदारांनी कोणत्या उमेदवारांवर विश्वास दाखवून मतदान यंत्रात बंदिस्त झालेल्या मतदानातून २३ तारखेला दिसेल.