Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पाटील यांना मंत्रिपद ?

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे
⬛ शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देऊन भाजपने कोकण व विशेषतः रायगडमधील कक्षा रुंदविण्याच्या दृष्टीने भर दिला आहे. त्याचबरोबर आगरी समाजाला प्रतिनिधीत्व देऊन हा समाजही बरोबर राहिल याची पक्षाने खबरदारी घेतली आहे. केंद्रीय मंत्रिमंळाच्या पुढील विस्तारात त्यांना मंत्रिपद निश्चित झाले असल्याचे जिल्हयात बोलले जात आहे. धैर्यशील पाटील यांचे वडील मोहन पाटील हे शेकापचे जेष्ठ नेते होते. त्यांनी राज्यमंत्रीपद भूषविले होते. लहान पणापासून धैर्यशील पाटील यांच्यावर डाव्या विचारांचा प्रचंड पगडा होता, ओघवती वक्तृत्वशैली, खणखणीत आवाज अभ्यासपूर्ण भाषणे यामुळे उत्तम वक्ता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पक्षसंघटनेत त्यांच्या कामाची दखल घेऊन शेतकरी कामगार पक्षाने सलग तीन वेळा पेण विधानसभेची उमेदवारी दिली. २००९ आणि २०१४ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. मात्र २०१९ मध्ये त्यांचा भाजपच्या रवींद्र पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवानंतर त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पक्षाच्या राजकीय विस्तारासाठी फायदा
केंद्रीय मंत्रिमंळाच्या पुढील
विस्तारात पैर्यशील पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. धैर्यशील पाटील यांची खासदारकी आणि मंत्रिपद मिळाल्यास कोकणात भाजपच्या राजकीय कक्षा रुंदावणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी नारायण राणे लोकसभेवर खासदार आहेत. आता रायगडमध्येही राज्यसभेवर भाजपचा खासदार असल्याने पक्षाच्या राजकीय विस्तारासाठी याचा फायदा होणार आहे. ठाणे व रायगडमधील आगरी समाजाला आपलेसे करण्यावर भाजपने भर दिला आहे. कपिल पाटील यांचा भिवंडी मतदारसंघात पराभव झाल्याने या समाजातील धैर्यशील पाटील यांना पुढील विस्तारात
मंत्रिपदाची संधी मिळेल असे बोलले जात आहे.
अंतुलेंनंतरचे राज्यसभेवर जाणारे दुसरे खासदार
भाजपने त्यांच्यावर दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यावेळी त्यांना लोकसभा निवडणूकीसाठी तयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी पक्षसंघटनावाढीवर भर दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनाच पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी रायगड जिल्हा भाजप कार्यकारिणीने पक्षश्रेष्ठींकडे केली होती, पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचा सूर होता. तरीही रायगड जिल्ह्यातील भाजपची यंत्रणा सुनील तटकरे यांच्या प्रचारात जोमाने उतरली होती. सुनील तटकरे यांच्या विजयात पेण आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे धैर्यशील पाटील यांना राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्यानंतर रायगडमधून राज्यसभेवर जाणारे धैर्यशील पाटील हे दुसरे खासदार आहेत.