✍️गडब / अवंतिका म्हात्रे
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पदोपदी गणित विषयाचे उपयोजन विद्यार्थ्याला विविध क्षेत्रात करावेच लागते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात गणिताचे उपयोजन करताना बहुतांशी विद्यार्थी गोंधळताना दिसतात. दैनंदिन आर्थिक व्यवहारात तो मागे पडताना आपण पाहतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे गणित अध्ययन अध्यापन हे आकलन युक्त न होता घोकंपट्टीवर जास्त भर दिला जातो. संकल्पनांची मूर्त-अमूर्तता लक्षात न घेता अध्यापकांनी केवळ फलका आधारे केलेल्या अध्यापनाला अनेक मर्यादा येऊन आकलनाला बाधा येते. यासाठी अध्यापन पध्दती व नाविन्यपूर्ण क्लृप्त्यांची जोड देऊन अध्यापन प्रभावी करणे ही काळाची गरज बनली आहे.
B प्राथमिक शिक्षण विभाग म्हणजे छोट्या वयामध्ये विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने शैक्षणिक मूल्यांची रुजावणूक करणारा विभाग आहे. शिक्षण प्रणाली मध्ये सर्वात जास्त मेहनत घेऊन आपल्या विद्यार्थी वर्गाला सतत ज्ञानदान करणारा विभाग आहे. मात्र वर्गामधील वाढती विद्यार्थी संख्या, शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त देण्यात येणारी इतर कामे यामुळे शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यासोबत वैयक्तिक संवाद साधता येत नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या सर्वच गणिती संकल्पना स्पष्ट होत नाही यावर होतो.
विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात गणित विषयाची फार महत्वाची भूमिका आहे. गणितातील अवघड संकल्पना समजण्यासाठी त्या गणितीसंकल्पनेवर आधारित प्रत्यक्ष गणित शैक्षणिक साहित्य, क्लृप्ती अथवा युक्ती वापरून उदाहरणे सोडवून दाखवल्यास ती संकल्पना समजण्यास अधिक मदत होईल.
प्रत्यक्ष साहित्य वापरून गणिती अनुभव घेताना विद्यार्थ्यांचे लक्ष इतरत्र न जाता अध्यापन विषयवार राहील. त्यामुळे गणिती घटकांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून व कृतीतून खूप काही शिकायला मिळते. निर्जीव वस्तू सुध्दा एखाद्या विषयावर ज्ञान देऊन जाते. हे शिक्षकाला माहित असल्यास प्रत्येक शिक्षक चांगला विद्यार्थी घडवू शकतो. याचा आत्मविश्वास प्रत्येक शिक्षकाला असला पाहिजे.
शालेय जीवनात विद्यार्थ्याच्या अध्ययनावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो. एकाच वर्गात अनेक विद्यार्थी असल्याने व प्रत्येकाचा बौद्धिक स्तर वेगवेगळा असल्याने शिक्षक सुध्दा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या बऱ्याच गणिती संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्याच बरोबर आजचा विद्यार्थी हा परीक्षार्थी बनला आहे. बऱ्याच वेळा पाठांतर पध्दतीचा पारंपारिक पध्दतीचा अवलंब करून अध्ययन करतो. तर काही वेळेस विद्यार्थ्याचा एखाद्या विषयासंबंधी ठराविक दृष्टीकोन ठरलेला असतो. सद्यस्थितीचा विचार करता काही विद्यार्थ्यांना गणित विषय आवडत नाही. किंवा त्यांना कठीण वाटतो. म्हणून विद्यार्थी गणित विषयाकडे लक्ष देत नाहीत. गणिता बाबत विद्यार्थ्यांचा निरसपणा असल्यामुळे गणितातील मुलभूत क्षेत्रांकडे आणि संकल्पनांकडे दुलर्क्ष करतात. त्याचा परिणाम त्यांच्या एकूण गुणवत्तेवर होताना दिसतो.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्याचा गणिती बौद्धिक विकास साधत असताना गणिती क्रिया कौश्ल्यात्मक विकास साधणे अत्यंत महत्वाचे आहे.
गणित विषयात क्लुप्त्यांना फार महत्व आहे. क्लुप्त्यांमुळे गणिती संकल्पना समजण्यास मदत होते. व गणिती कौशल्य विकसित होतात. त्या कौशल्यामध्ये सुसूत्रता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा वाटू लागतो. व विद्यार्थी गणितातून व्यक्त होताना दिसतो. व त्याच्या शैक्षणिक जीवनात अमुलाग्र बदल झालेला आपण पाहतो.
*श्री. राजेंद्र महादेव पाटील, (सहशिक्षक) "रायगड जिल्हा परिषद शाळा अंतोरे, ता. पेण, जि. रायगड*
एम.ए.बी.एड. मुंबई विद्यापीठ एम.ए.एज्युकेशन, मुंबई विद्यापीठ एल.एल.बी. मुंबई विद्यापीठ डी.एस.एम. (य.च.मु.वि. नाशिक) पी.एच.डी. (अँपिअर) मुंबई विद्यापीठ