✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
गणित हा असा एक विषय आहे. जो मानवी व्यवहार क्रिया-प्रतिक्रिया यांचा अभ्यास करणारा विषय आहे. गणित विषयाचा सर्व विषयांशी संबंध येतो. अर्थशास्त्र, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र यांच्या गणनाचे शास्त्र म्हणून गणित विषयाकडे पाहिले जाते.
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आज आधुनिक तंत्रज्ञानाने प्रभाव टाकलेला आहे. अत्यंत प्रभावीपणे त्याचा वापर करण्यात येत आहे. एवढेच नाही तर त्यामुळे त्या त्या क्षेत्रातील गुणवत्तेत आणि उत्पादकतेत कल्पनातीत वृध्दी झालेली दिसून येते हे सर्व गणित अभ्यासानेच शक्य झाले आहे. गणित विषयाची जास्तीत जास्त गोडी विद्यार्थ्यामध्ये निर्माण होण्यासाठी नाविन्यपूर्ण क्लुप्त्यांच्या बलस्थानांचा, वैशिष्ट्याचा शिक्षणात सुध्दा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे गणित विषयातील अध्ययन अधिक आकलनयुक्त आणि चिरकाल टिकाऊ होण्यासाठी या गणिती नाविन्यपूर्ण क्लुप्त्यांचा कितपत उपयोग होतोहे अभ्यासणे महत्वाचे आहे.
नाविन्यपूर्ण क्लुप्त्यांच्या द्वारे होणारे अध्ययन अध्यापन हे पारंपारिक अध्यापनापेक्षा अधिक परिणामकारक असेल तर विद्यार्थ्यांची उपरोल्लिखित गणित विषयातील सद्यस्थिती सुधारून त्यांचा देश बांधणीत देश उभारणीत आणि देश विकासात निश्चित उपयोग करणे शक्य आहे. आणि म्हणून गणित विषयाच्या संशोधना मध्ये सातत्य राहणे महत्वाचे आहे.
उच्च प्राथमिक स्तरावरील गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातील निवडक संकल्पनांच्या आकलनासाठी नाविन्य पूर्ण क्लुप्त्या विकसित करून अध्ययन अध्यापनात त्याचा वापर सुलभतेने करणे शक्य असल्याने, खेडोपाडी दुर्गम भागातील विना अनुदानित व साहित्याची उणीव असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे शाळेत येऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध शाळांतील नवनियुक्त शिक्षकांनाही आपल्या दैनंदिन अध्यापनासाठी हे अध्यापन साहित्य अतिशय उपयुक्त ठरेल.
गणित हा विषय मानवाच्या दैनदिन जीवनाशी निगडीत आहे. मानवी दैनंदिन आर्थिक व्यवहार असो वा एखाद्या विषयाचे मोजमाप असो. अथवा देवाणघेवाण असो प्रत्येक वेळी आपणाला गणित विषयाचा आधार घ्यावा लागतो. गणित विषयाचा नित्य दैनंदिन जीवनावर कसा प्रभाव पडतो यांची समज, मानवास असणे गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक असल्याने नागरिकांच्या जीवनास सर्वस्पर्शी असणारा हा विषय विद्यार्थाने काळजीपूर्वक अभ्यासणे गरजेचे आहे.
मानवी व्यवहाराशी गणित विषयक समस्या घराघरात आहेत. शाळाशाळांत आहेत. विद्यार्थी विद्यार्थ्यांत आहेत. या विषयातील सखोल माहिती मिळविण्यासाठी गणित विषयाचे ज्ञान आवश्यक आहे.
उच्च प्राथमिक स्तरावर गणित विषयातील बऱ्याच संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजत नाहीत. त्यावर आधारित उदाहरणे सोडविता येत नाहीत. उदाहरणातील पायऱ्या सोडविताना विद्यार्थी अडखळताना दिसतात. गणित विषयाच्या अध्ययन अध्यापनात विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेस वाव आहे. गणित विषयाच्या संदर्भातील गणिती संकल्पना, अध्ययन चिरकाल टिकावे, व्यवहार ज्ञानाशी सुसंगत व्हावे, भविष्यात त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होत राहणे गरजेचे आहे.
*अध्ययन -* अध्यापनाच्या प्रक्रियेस विद्यार्थी हा केंद्रस्थानी असला तरी योग्य अध्ययन अनुभूती देणाऱ्या शिक्षकाचे स्थानही महत्वाचे आहे. त्यामुळे गणित विषय शिकविण्याचे तंत्र नाविन्यपूर्ण क्लुप्त्या गणिती शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यामध्ये अपेक्षित बदल करता येईल. गणिती समस्यांचा अभ्यास केल्याने शासनाचा शिक्षण विभाग, प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, संस्था विद्यार्थी, शिक्षक व नवीन गणित संशोधक यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल व भविष्यात गणित अध्यापनाममुळे आपले जीवन सुखी होण्यास मदत होईल.
♦️ *श्री. राजेंद्र महादेव पाटील, (सहशिक्षक) “रायगड जिल्हा परिषद शाळा अंतोरे, ता. पेण, जि. रायगड ” एम.ए.बी.एड. मुंबई विद्यापीठ एम.ए.एज्युकेशन, मुंबई विद्यापीठ एल.एल.बी. मुंबई विद्यापीठ डी.एस.एम. (य.च.मु.वि. नाशिक) पी.एच.डी. (अँपिअर) मुंबई विद्यापीठ*