गडब/सुरेश म्हात्रे
⬛पेण गेले दोन दिवस पेण तालुक्याला पावसाने झोडपले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले असून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे पेण ग्रामीण भागातील नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेताच्या बांधांना खांडी जाऊन पाणी भात शेतीत घुसले आहे. त्यामुळे भाताची रोप कुजून जाण्याची भीती आहे. पाण्यासोबत वाहुन आलेल्या गाळाखाली रोपे गाडली जाण्याचीही शक्यता काही निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणून पेरणी केली होती तर रोपांना खते दिली होती तर किटकनाशकांचीही फवारणी केली होती. हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पेणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि पेणच्या तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी खाडी तसेच भोगावती नदी किनाऱ्यावरील गावांना आणि ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यापासून कोसळत असलेल्या पावसामुळे हेटवणे धरण ९० टक्के भरले आहे.