✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे*
गणित अध्यापन पध्दतीचा शिक्षकाने व्यवस्थित अभ्यास केला तर विद्यार्थी परिणामकारकपणे शिकतो. कारण त्या गणिती संकल्पना शिक्षकाने तेवढ्याच पोटतिडकीने विद्यार्थ्यासमोर मांडलेल्या असतात. गणित अध्यापनाचा उपजत गुण एखाद्या शिक्षकाला असूही शकेल पण काहीना मात्र तो सराव, प्रशिक्षण, नाविन्याचा शोध या द्वारे गणिती अध्यापन पध्दती अंगी बाणवता येतील. नवनवीन गणिती क्लुप्त्यांचा शोध घेऊन आपल्या विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवता येतील.
गणित अध्यापन तंत्रात दिवसेंदिवस सुधारणा व नवनवीन शोध लागताना दिसत आहेत. नाविन्यपूर्ण क्लुप्त्या रोज नव्याने समोर येताना दिसत आहेत. त्यांच्यातही काही गुण दोष आहेत. त्यातील गुणांचा अधिक वापर करून त्या वर्गातील अध्यापन पध्दती वापरल्या पाहिजेत. तसेच कोणती क्लुप्ती कधी वापरावी यांचे तंत्र सुध्दा अभ्यासले पाहिजे.
आज संपूर्ण भारत देशात गणित विषयाची राज्यानुसार स्थिती पहिली असता सर्वेक्षणात आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थिती फारच विदारक असल्याचे चित्र आपणा समोर आहे. याचे मूळ शालेय स्तरावरील गणित विषयाच्या कच्च्या पायात दिसते. यासाठी शालेय स्तरावर गणित विषयाचे आकलन युक्त अध्यापन होणे आवश्यक आहे. नाविन्यपूर्ण क्लुप्त्यांच्या वापरातून हे साध्य होऊ शकते का ? शालेय स्तरावर गणित विषयाच्या रंजक अध्ययन अध्यापनासाठी नाविन्यपूर्ण क्लुप्त्या कितपत प्रभावी व उपयुक्त ठरतील ? हे सतत शिक्षकांनी शोधत राहिले पाहिजे.
गणित विषया बाबत तर प्रत्यक्ष अनुभव व मार्गदर्शनाला अनन्यसाधारण महत्व आहे. आताचे विद्यार्थी हे कुशाग्र बुध्दीचे आहेत. त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना सतत शिक्षक मित्रांनी पारंपारिक अध्यापन पध्दतीद्वारे शिकवून चालणार नाही. जर असे केले तर विद्यार्थ्यांना गणित विषय शिकण्यात रस वाटणार नाही.यासाठी गणित अध्यापनात नाविन्यपूर्ण क्लुप्त्या वापरून विद्यार्थी गुणवत्तापूर्ण होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण गणिती क्लुप्त्यांची घटकानुरूप निर्मिती करून विद्यार्थ्यांना गणित विषयात गोडी लावणे गरजेचे आहे.
उच्च प्राथमिक स्तरावरील गणित विषयाच्या घटकांवर आधारित नाविन्यपूर्ण क्लुप्त्या तयार करून कमी वेळेत, कमी खर्चात गणित विषयातील अवघड घटक सोप्या पध्दतीने समजण्यास मदत होईल. अध्यापनात रंजकता येऊन विद्यार्थी अवधान टिकवून ठेवण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण क्लुप्त्या प्रत्यक्ष हाताळण्यास मिळाल्यामुळे गणित अभ्यासात गोडी निर्माण होईल. गणित विषयात रुची वाढून विद्यार्थ्याच्या गणित विषयाच्या संपादणूकी मध्ये भर पडेल.त्याच बरोबर हे संशोधन नवीन संशोधकांना मार्गदर्शक साहित्य म्हणून उपोयोगी पडेल. नवीन संशोधक शिक्षक मार्गदर्शक यांना गणिती क्लुप्त्या तयार करण्यास मार्गदर्शक ठरेल. त्याच बरोबर गणिती समस्यांवर नविन उपाययोजना राबविण्यास मदतगार होईल.
श्री. राजेंद्र महादेव पाटील, (सहशिक्षक) रायगड जिल्हा परिषद शाळा अंतोरे, ता. पेण, जि. रायगड
एम.ए.बी.एड. मुंबई विद्यापीठ* एम.ए.एज्युकेशन, मुंबई विद्यापीठ एल.एल.बी. मुंबई विद्यापीठ डी.एस.एम. (य.च.मु.वि. नाशिक) पी.एच.डी. (अँपिअर) मुंबई विद्यापीठ