*गडब/अवंतिका म्हात्रे*
महावितरण कंपनीच्या वाढलेल्या विद्युत दराबाबत शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. शासनाने वीज मंडळाला पत्र देऊन वीज दर कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रायगड जिल्हा अंतर्गत महावितरणतर्फे घरगुती, वाणिज्य, औद्योगिक तसेच कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र एप्रिल महिन्यापासून महावितरण कंपनीमार्फत वाढीव वीज देयके ग्राहकांना दिली जात आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी येत आहेत
याबाबत माहिती घेतली असता, महावितरणतर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत नियमक आयोग यांच्याकडे वीज दरवाढीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर आयोगाकडून सूचना, हरकती घेऊन व सुनावणी करुन मंजुरी देण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे.
ही दरवाढ अन्यायकारक असून, महाराष्ट्र राज्य शासनामार्फत वीज नियमक आयोगाला वीज दरवाढीबाबत पत्र देऊन दर कमी करण्याची मागणी राजा केणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.