गडब/अवंतिका म्हात्रे
श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आणि मंत्री अदिती तटकरे या गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री होणार आहे.
राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. धर्माराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदिती तटकरे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा निर्णय घेत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती अजित पवार यांना दिली असल्याचेही त्यांनी गुरुवारी बोलताना सांगितले. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करायचे असल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री पद सोडणार असल्याचे धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले आहे. धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे, असे देखील सांगितले. गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गानं करणे वारंवार शक्य होत नाही, असेही आत्राम म्हणाले आहेत.