गडब/सुरेश म्हात्रे
⬛बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदारांनी मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादात सापडल्या असून इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या आज ताट आणि दिवा घेऊन मतदान केंद्रावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी थेट इव्हीएम मशीनची पूजा केली.
मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्याने याप्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून रुपाली चाकणकर या त्यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.
प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याबाबत त्यांनी केलेली विविध वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्या वादात सापडल्या आहेत.