गडब/सुरेश म्हात्रे
⬛आमच्यातले मतभेद आता दूर झाले असून रायगड जिल्ह्यातील आम्ही सर्व शिवसैनिक महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांचेच काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी तळा येथे केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा शहरातील मेकडे हॉल येथे मार्गदर्शन सभा पार पडली. यावेळी सभेला उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार भरत गोगावले म्हणाले, रायगड लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी आमच्यात असलेले मतभेद आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला एकत्र बसवून दूर केलेले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदेगटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत तटकरे यांचेच काम करावे.एकत्र सभा घेणार
शिवसेना शिंदेगट, भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट असे तिन्ही पक्ष मिळून एकत्र सभा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन भरत गोगावले यांनी केले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, उपजिल्हा प्रमुख भास्कर गोळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य लीलाधर खातू, तळा तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके यांसह शिवसेना शिंदेगटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.