गडब/सुरेश म्हात्रे
*लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय पक्षांमधील राजकारणाला गती आल्याचे दिसून येत आहे. मात्र प्रत्यक्षात या सोहळ्याचा महत्त्वाचा दुवा आहे, त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत नाही.
सर्वसामान्य नागरिक हे राजकारणाला कंटाळल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये पाहिल्यास 'नोटा'चे मतदान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यामुळे यंदादेखील अनेक पक्षांनी दिलेले अयोग्य उमेदवार आणि राज्यातील राजकारण याला कंटाळून लोक नोटाला मतदान करण्याची शक्यता अधिक आहे, असे मत निवडणूक कार्यालयातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. प्रत्येक पक्ष मतदाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये फोडाफोडीचे राजकारण, आरोप प्रत्यारोप अशा प्रकारचे राजकारण सुरू आहे. या सर्व राजकारणाला प्रत्यक्षात सर्वसामान्य मतदार हा कंटाळलेला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी काही पक्षांनी जे उमेदवार दिलेले आहेत.ते सर्वसामान्य नागरिकांना पसंत नाहीत, तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या राजकारणाला सर्वसामान्य नागरिक कंटाळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य मतदारांनी आपली वेगळी मते तयार केली आहेत.
*ग्रामीण भागात 'नोटा'ला पसंती*
गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आयोगाच्या आकडेवारीनुसार शहरी भागातील मतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी 'नोटा'चा वापर अधिक केलेला दिसला. या निवडणुकीत पालघरमधील मतदारांनी सर्वाधिक 'नोटा'चा वापर केला होता. या मतदारसंघातील २९ हजार ४७९ मतदारांनी 'नोटा' चे बटण दाबले होते. तर गडचिरोली - चिमूरमधील २४ हजार ४८८ मतदारांनी 'नोटा'च्या पर्यायाला पसंती दिली होती. यावेळी राज्यात चार टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान झाले.
*राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा*
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत सुमारे पाच लाख मतदारांनी त्यावेळी 'नोटा'ला पसंती दिली होती. मात्र मागील निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकारण आता आहे तसे नव्हते. मात्र सध्याच्या राजकारणाला सामान्य नागरिक कंटाळलेले आहेत. अपक्षांसह कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराला आपले मत देण्याचे सध्याची मानसिकता दिसत नाही. ही मतदारांची सर्वपक्षीय नाराजी राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच यंदाही नोटा मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे.
*२०१९मध्ये भाजपला मिळाली २७.७६ टक्के मते*
गेल्या लोकसभा निवडणुकीतील एकूण सर्व पक्षांना मिळालेल्या मतांचे गणित पाहिले तर राज्यात भाजपला २७.७६ टक्के (१ कोटी ४९ लाखांहून अधिक) मते मिळाली होती. तर शिवसेनेला २३.३ टक्के (१ कोटी २५ लाख ८९ हजारांहून अधिक) मते मिळाली.
तनंतर या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला १६.३ टक्के (८७ लाख ९२ हजारांहून अधिक), तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५.५ टक्के (८३ लाख ८७ हजारांहून अधिक) मते मिळाली होती. इतरांना १४.६ टक्के (७८ लाख ६५ हजारांहून अधिक) आणि 'नोटा'ला (४ लाख ८८ हजारांहून अधिक) मतदान झाले होते.
*मतदारांमध्ये नाराजी*
सध्याचे फोडाफोडीचे- कूटनीतीचे राजकारण आणि खालच्या पातळीवरील आरोप प्रत्यारोप पाहिल्यावर अनेक मतदारांमध्ये मतदानाबाबत नाराजी निर्माण होत आहे. त्यात मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून ईव्हीएम मशीनवरील नोटाच्या बटणाचा वापर वाढत चालल्याचे दिसून येते. मागील वर्षी ४ लाख ८८ हजारांहून अधिक मतदारांनी उमेदवाराला निवडण्यापेक्षा 'नोटा'चा पर्याय निवडला होता. या वर्षीही लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चा वापर वाढेल, असे जाणकार सांगत आहेत.'नोटा' मुळे उमेदवार नाकारण्याचा अधिकार मतदारांना मिळाला आहे.
निवडणूक आयोगाकडील लोकसभा निवडणुकीची मागील दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर प्रचीती येते की. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये 'नोटा'चा वापर वाढला आहे.