गडब/सुरेश म्हात्रे
कधीकाळी रायगड़ जिल्ह्याच्या राजकारणात स्वबळावर आपल्या पक्षाचा खासदार निवडून आणणारे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांचे स्थान आता युती आणि आघाडीच्या घटक पक्षांपुरतेच मर्यादित राहिले आहे. बदलत्या राजकीय वार्याचा परिणाम या दोन पक्षांवरही मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ कोणाच्या बाजूने उभा राहतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहेत. सध्या रायगड मतदार संघ म्हणून ओळखला जाणारा लोकसभेचा मतदारसंघ यापूर्वी कुलाबा मतदार संघ म्हणून ओळखला जात होता. रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर हे दोन तालुके रत्नागिरी मतदारसंघाला जोडलेगेले होते.
रायगड जिल्ह्यातील राजकारणाचा ज्यावेळी विषय निघतो त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नाव प्राधान्याने घेतले जाते. अनेक दिग्गज नेतेशेतकरी कामगार पक्षातअसल्याने या पक्षाचे जिल्ह्यामध्ये मोठे वर्चस्व होते. त्यातच पनवेल अलिबाग पेण ठरण या भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष मोठ्या प्रमाणात पसरलेला होता, त्याच तुलनेत प्रमुख काँग्रेस पक्ष हा देखील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले अस्तित्व राखून होता. काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन पक्ष जिल्ह्यातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी पक्ष होते. रायगड जिल्ह्यातील सर्व निवडणुका हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असत. अस्तित्वासाठी लढाई बॅरिस्टर अंतुले यांच्यासोबत काँग्रेस पक्ष वाढवणारे सुनील तटकरे यांनी व माणिक जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपला सरोबा केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस एकाकी पडली. माणिक जगताप पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर ठिकाणी काँग्रेसला मतदारांचे फारसे पाठबळ मिळाले नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील हे दोन पक्ष आता पुन्हा आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे यावेळी होणारी ही निवडणूक रायगड मतदारसंघांमध्ये कोणत्या नव्या पक्ष धोरणाला मदत करते हे स्पष्ट होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेवर देखील शेकाप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी चुरस असे. परंतु राजकारणामध्ये कोणतीही परिस्थितीत कायम राहत नाही मित्र शत्रु व शत्रु मित्र बनतात. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील हे दोन पक्ष रायगडच्या लोकसभा निवडणुकांमध्ये घटक पक्ष म्हणून उरले आहेत.