गडब/सुरेश म्हात्रे
⬛रायगड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीने बारामती पॅटर्न राबविण्याचे धोरण स्विकारले आहे. सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचारासाठी महाविकास आघाडीने त्यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे यांना प्रचारात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ते तटकरेंविरोधात प्रचाराची धुरा संभाळतांना दिसत आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा दोन तुल्यबळ उमेदवारांमधील लढत पहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे सुनील तटकरे विरुध्द अनंत गिते लढतीचा तिसरा सामना सुरू झाला आहे.