गडब/सुरेश म्हात्रे
⬛पुरातन काळापासून होळी सणाचे महत्व असून विज्ञान आणि अत्याधुनिक काळात देखील तेवढ्याच श्रद्धेने आणि परंपरेने होलिकोसत्व साजरा केला जातोय असे आपण पाहत आलो आहोत. कारण याला पौराणिक आणि वैज्ञानिक महत्व आहे. संपूर्ण भारतात रंगाचा हा आनंददायी सण साजरा करताना दिसतात.
होळी सणाला पौराणीक कारण आहे. पुरातन काळात राजा हिरण्यकश्यपू हा स्वतःला देव समजू लागला होता. त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता, ही गोष्ट हिरण्यकश्यपू ला आजिबात आवडत नसल्याने त्याने प्रल्हाद याला परावृत्त करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. ऐकत नसल्याने हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला जाळून मारण्यासाठी बहीण होलिकाची
मदत घेतली. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. हिरण्यकश्यपू राजाच्या सांगण्यावरून होलिकाने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्रीत प्रवेश केला. प्रत्यक्षात भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हादाला काहीही न होता वाचला, आणि वाईट हेतूने आलेली होलिका वरदान असूनही आगीत भस्मसात झाली. तात्पर्य वाईटावर चांगल्याप्रवृत्तीचा विजय
होतो. या घटनेच्या प्रित्यर्थ फाल्गुनी पौर्णिमेला होळी दहन केले जाते. दुसऱ्या दिवशी रंगाची धुळवड साजरी केली जाते. हा रंगाचा सण असल्याने सर्वच जण याची आतुरतेने वाट पाहत असतात. होळी साठी लाकडे, गोवऱ्या आणून गावागावांतून सुपारी किंवा भेंडीचे, एरंडाचे झाड आणून होळी रचली जाते. होळीला विधिवत पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. जे अमंगल वाईट आहे,
कालबाहा आहे त्याचा नाश करून नव्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.
होळी सणाला वैज्ञानिक कारण देखील आहे. या सणापासून वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. हिवाळा सम ाप्त होऊन उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा हा काळ असल्याने निसर्गचक्र दाहकतेकडे जाण्याचा हा काळ असतो. थंडीच्या दिवसात आपले शरीर सुस्त झालेले असते.या मुळे शारीरिक थकवा आल्या सारखे जाणवते. वसंत ऋतूत उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहना मुळे निर्माण झालेला अग्नी माणसाच्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत करून ताजेतवाने करतो. निसर्गातील हा बदल मानवाने स्वीकारावा या साठी होळी साजरी केली जाते. अशी वैज्ञानिक कारणे त्यामागे आहेत.